हयातीचा दाखला तलाठी | Proof of survival Talathi

हयातीचा दाखला तलाठी | Proof of survival Talathi

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी जिवंतपणी देखील हयातीचा दाखला घ्यावा लागतो. यासाठी तलाठी कार्यालयात ताटकळत थांबावे लागतेच, पण आर्थिक लूटही केली जात आहे. इचलकरंजी शहरात नऊ हजारांहून अधिक लाभार्थ्यांची परवड थांबणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात संजय गांधी निराधार योजनेचे सुमारे तेरा हजार लाभार्थी आहेत. यामध्ये कबनूर, चंदूर, कोरोची , तारदाळ , खोतवाडीसह इचलकरंजी शहराचा समावेश आहे. एकट्या इचलकरंजीत नऊ हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. सरकारकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदनासाठी सरकारी तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. जिल्हा मध्यवर्धी सहकारी बँकेत अनुदान मिळत असल्याने सरकारी नियमानुसार प्रत्येक वर्षी एप्रिल महीन्यात लाभार्थी हा हयात आहे का, याची खातरजमा करण्यासाठी बँकेत दाखला जमा करावा लागतो.

यंदाही दाखला मिळविण्यासाठी लाभार्थी सकाळपासूनच तलाठी कार्यालयासमोर ताटकळत उभे असतात. कार्यालयात दैनंदिन कामात अधिक रस असणारे कर्मचारी अशा लाभार्थ्यांची दखलच घेत नाहीत. तुटपुंज्या अनुदानासाठी पायपीट करून येणाऱ्या लाभार्थ्यांना या कार्यालयातील कर्मचारी अक्षरशः लुटत आहेत. अज्ञानपणाचा गैरफायदा घेत कोणतीही सरकारी पावती न देता प्रत्येकी वीस रुपये उकळले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी पुरवठा कार्यालयात सहाय्यक तलाठी महिलेने पैसे उकळल्याचे उघड होताच पुरवठा निरीक्षकांनी त्यांना तेथून हाकलून लावले होते. याबाबतची तक्रार हातकणंगले तहसिलदार राजश्री राजमाने यांच्याकडे झाली आहे. त्यानंतर पुन्हा तलाठी कार्यालयात लाभार्थ्यांची अडवणूक केली जात आहे.

नऊ हजाराहून अधिक लाभार्थ्यांकडून प्रत्येकी वीस रुपयांची वसुली केवळ हयातीच्या दाखल्यासाठी केली जात आहे. याला आवर घालण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. गोरगरीब लाभार्थ्यांची लूटमार करणाऱ्या तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना साडी चोळीचा आहेर दिला जाणार आहे.